बंगाल आणि बिहार राज्यातील आगीच्या दोन घटनांमध्ये १४ जणांचा होरपळ मृत्यू

Foto
कोलकता : पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये आग लागली. यात सात जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. एसी युनिटमधील शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रावण सोमवारच्या उत्सवासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी तारापीठ मंदिराला भेट दिली होती. ते तेथील एका हॉटेलमध्ये थांबले होते. पहाटे साडे चारच्या सुमारास ते झोपलेले असताना आग लागली. अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच आग नियंत्रणात आणण्यात आली. हॉटेलमध्ये अडकलेल्या भाविकांना बाहेर काढले जात आहे. जखमींना रामपूरहाट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेतून बचावलेल्या कोलकाता येथील एका महिलेने सांगितले, अचानक संपूर्ण हॉटेल धुराने भरले. आम्हाला श्वास घेता येत नव्हता आणि बाहेर पडण्याचा मार्ग शोधणे कठीण झाले होते.

दोषपूर्ण एसी वायरिंगमुळे आगीचा धोका
एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे विजेच्या प्रवाहात अचानक वाढ होऊ शकते. यामुळे एसी वायरिंगमधील इन्सुलेशन गरम होऊन जळू शकते, ज्यामुळे तारा एकमेकांच्या संपर्कात येतात. या प्रक्रियेदरम्यान ठिणग्या पडून आग लागू शकते.

तारापीठ मंदिर हे देवी ताराला समर्पित 
तारापीठ मंदिर हे पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यात असलेले, देवी ताराला समर्पित एक प्रसिद्ध मंदिर आहे. येथे मोठ्या संख्येने भाविक येतात. येथील मूर्तीमध्ये भगवान शिव देवी ताराच्या मांडीवर बसलेले दाखवले आहेत. दिवसा सोन्याचा मुखवटा घातला जातो, पण रात्री तो काढला जातो. मंदिराजवळ तारापीठ महास्मशान आहे, जे तांत्रिक साधनेचे एक ठिकाण आहे. तारापीठ हे देवी ताराचे प्रसिद्ध तांत्रिक साधक आणि भक्त, बामखेपा यांच्याशी देखील संबंधित आहे. त्यांची समाधी आणि स्मारक मंदिर देखील येथेच आहे.

बिहारच्या अशोकधाम मंदिरात मोठी दुर्घटना; भर गर्दीत विजेची तार पडली, ७ जणांचा मृत्यू,

पटना : बिहारमधील लखीसराय येथील प्रसिद्ध अशोकधाम मंदिरात सकाळीच एक मोठी दुर्घटना घडली. श्रावण महिन्याच्या सोमवारी भगवान शिवाला जल अर्पण करण्यासाठी या मंदिरात भाविकांची अलोट गर्दी जमली होती. या गर्दीत अचानक विजेची तार पडल्याने उपस्थित भाविकांना वीजेचा जोरदार झटका बसला. शॉक लागण्याची घटना घडताच लोकांनी पळापळ करण्यास सुरुवात केली आणि मंदिर परिसरात चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटने सात भाविकांचा मृत्यू झाला आणि डझनहून अधिक जण जखमी झाले.

 समोर आलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी मंदिराच्या परिसरात मोठी गर्दी जमली होती. जलाभिषेकासाठी जवळपास ५०,००० भाविक रांगेत उभे होते. विजेची तार पडल्याने घाबरलेल्या लोकांनी सैरावैरा पळ काढला, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली. गर्दीत चिरडून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलीस, प्रशासकीय अधिकारी आणि वैद्यकीय पथके घटनास्थळी दाखल झाली. जखमींना तात्काळ लखीसराय सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे. प्रशासन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे.